आषाढी सोहळ्यासाठी श्री संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना

Foto
पैठण, (प्रतिनिधी)  : "ज्ञानोबा माऊली तुकाराम...जय जय रामकृष्ण हरी... तसेच एका जनार्दनी, पंढरीनाथ माझा,विठ्ठल विठ्ठल गजर अखंड साचा... या अभंगांच्या गजरात पैठण येथून श्री संत एकनाथ महाराजांची पालखी मंगळवारी सूर्यास्ताच्या वेळी 427 व्याआषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे उत्साहपूर्ण वातावरणात सूर्यास्ताच्या वेळी रवाना झाली.
पहाटेपासूनच श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर व नाथांचा राहतावाडा परिसरात वारकरी,भाविक आणि दिंड्यांची मोठी गर्दी झाली होती.टाळ-मृदुंगाच्या निनादात, वीणेच्या मंजुळ स्वरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय रामकृष्ण हरी" बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री संत नामदेव तुकाराम श्री संत एकनाथ महाराज की जय या नामघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

पालखी प्रस्थानापूर्वी श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले,योगेश महाराज पालखीवाले यांच्या हस्ते पूजन,आरती आणि महापूजा करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे विधिवत पूजन करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले.यावेळी वारकऱ्यांनी फुगड्या,भारुडे आणि अभंग गायन करत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला. पालखी प्रस्थानाच्या रस्त्यावर पैठणकरांनी ठिकठिकाणी सडा रांगोळी टाकून परिसर सुशोभित केला होता. 
पैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले असून मार्गातील विविध गावांमध्ये पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे.18 मुक्कामानंतर पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे या पालखीत सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविकांसाठी ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याचे पाणी,चहा,वैद्यकीय सुविधा आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी श्री संत एकनाथ महाराजांची पालखी दाखल होणार असून,महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील हा सोहळा भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा मानला जातो.

-- पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी -- 
श्री संत एकनाथ महाराजांची पालखी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून वारकरी संप्रदायाच्या भक्ती,समता आणि मानवतेच्या विचारांची अखंड परंपरा आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत.पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य जपत हा सोहळा यशस्वी करावा.श्री संत एकनाथ महाराजांचा समतेचा आणि समाजप्रबोधनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही वारी प्रेरणादायी ठरेल. श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्व भाविकांचा प्रवास सुखरूप व मंगलमय होवो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

पालखी प्रस्थान प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा,पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव,अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जाधव , तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे,पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्यासह विविध पक्षाचे पुढारी, पदाधिकारी,कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे  यांनी मोठा पोलीस तैनात केला होता.